logo

हायकोर्टात विवेक पालटकरची फाशीची शिक्षा कायम ; नंदनवन आराधनानगरातील पाच जणांचे हत्याकांड

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधनानगर येथील पाच जणांच्या हत्याकांडातील आरोपी नराधम विवेक गुलाबराव पालटकर याची फाशीची शिक्षा बुधवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्या खंडपीठाने कायम ठेवली.
15 एप्रिल 2023 रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एस .पावसकर यांच्या न्यायालयाने पालटकर याला मरेपर्यंत मृत्यूदंड आणि 50 हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. 18 डिसेंबर 2023 रोजी सुनावणी पूर्ण होऊन आज निवाडा जाहीर करण्यात आला.
हत्याकांडाची हकीकत अशी, 43 वर्षीय आरोपी विवेक पालटकर हा मूळचा नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्याच्या रेवराळनजीकच्या नवरगाव येथील रहिवासी आहे. प्रॉपर्टी डीलर मृतक कमलाकर पवनकर हे आरोपी विवेक पालटकर याचे मेव्हणे होते . आरोपी विवेक पालकर याला पत्नीच्या खुनामध्ये जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यातून उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली होती . न्यायालयाचा सर्व खर्च मृतक कमलाकर पवनकर यांनी केला होता.
आरोपी विवेक याची मुले वैष्णवी पालटकर (8) आणि क्रिष्णा पालटकर (4 ) हे 2014 पासून मृतक कमलाकर पवनकर यांच्याकडेच आराधनानगर येथे राहत होते .
आरोपीची शेती कमलाकर ठेक्याने लावत होते व आलेल्या पैशामधून मुलांच्या उदरनिर्वाहाचा आणि कोर्ट खर्च करत होते. आरोपी विवेक पालटकर 2017 मध्ये जेल मधून बाहेर आल्यानंतर तो काही दिवस आपला भाऊजी मृतक कमलाकर पवनकर यांच्याकडे राहत होता व सेक्युरिटीमध्ये काम करीत होता. सहा महिन्यापूर्वी त्याने खरबीनगर येथे रमेश गिरीपुंजे यांच्याकडे स्वतःचे खोटे नाव जिभकाटे सांगून किरायने खोली घेतली होती. याच दरमान्य आरोपीने स्वतःची शेती ठेक्याने दिली होती . त्यामुळे मृतक कमलाकर हे आरोपीला मुलांवर झालेला पालनपोषणाचा खर्च आणि कोर्ट कामाकरीता लागलेला खर्च 5 लाख रुपये मागत होते तसेच आरोपी जेलमध्ये असताना मृतक कमलातर यांनी आपल्या सावत्र बहिणीला दोन एकराचा हिस्सा दिला होता. त्यामुळे कमलाकर आणि आरोपीमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. शेती विकून माझे पैसे परत कर , असे कमलाकर त्याला सतत म्हणत होते त्यामुळे आरोपी विवेक पालटकर याला मृतक कमलाकरचा प्रचंड राग होता.
विवेक हा 10 जून 2018 रोजी रात्री अंदाजे 9.30 ते 10 दरम्यान मोटार सायकलने कमलाकर पावनकर यांच्या घरी आला होता. त्याच रात्री पहाटे तीनच्या सुमारास आरोपीने निर्दयपणे लोखंडी सब्बलने एकामागे एक असे पाच जणांच्या डोक्यावर प्रहार करुन झोपेतच त्यांचा खून केला होता. कमलाकर मोतीराम पवनकर (53) , त्यांची पत्नी अर्चना पवनकर (45) , आई मिराबाई पवनकर (70), मुलगी वेदांती कमलाकर पवनकर (15) आणि खुद्द आरोपीचा मुलगा कृष्णा विवेक पालटकर (4) , अशी मृतांची नावे आहेत.
हल्ल्यात आरोपीची मुलगी वैष्णवी आणि मृतकाची मुलगी मिताली पवनकर बचावल्या होत्या.
उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील संजय डोईफोडे, सरकारला सहाय्य म्हणून ॲड.मोहम्मद अतिक यांनी काम पाहिले.

339
13178 views